

नांदूरमध्यमेश्वर : हिवाळ्याची चाहूल लागताच नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देश-विदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. रामसर स्थळाचा दर्जा लाभलेल्या या अभयारण्यात सध्या सुमारे ४८ हजार पक्ष्यांनी मुक्काम ठोकल्याने संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने निनादून गेला आहे.
वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, दाखल झालेल्या पक्ष्यांमध्ये सुमारे ३५ हजार पाणपक्षी तर १३ हजार रानपक्षी आहेत. उत्तरकडील देशांमध्ये वाढलेल्या तीव्र थंडीमुळे सायबेरिया, मंगोलिया, कझाकस्तान आणि पाकिस्तानमधून हे पक्षी स्थलांतर करून येथे येतात. परिणामी, अभयारण्यात जैवविविधतेचा मनोहारी देखावा सध्या पाहायला मिळत आहे.
नदीकाठची पाणथळ क्षेत्रे, दलदलीचा परिसर आणि विपुल अन्नसाठा उपलब्ध असल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित आणि अनुकूल ठरत आहे. पहाटे व सकाळच्या वेळेत नदीपात्रात विहार करणारे पक्षी, तर दुपारी झाडांवर विसावलेले थवे सहज दिसून येतात. सायंकाळी संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या कलरवाने भारून जातो.

वनविभाग, पक्षीमित्र आणि स्थानिक गाईड यांच्या सहकार्याने दरवर्षी हिवाळ्यात पक्षी गणना मोहिम राबवली जाते. या हंगामात आतापर्यंत अनेक टप्प्यांत गणना करण्यात आली असून, पुढील काही दिवसांत अधिक अचूक आकडेवारी समोर येण्याची शक्यता आहे.
अभयारण्यात केलेल्या वृक्षलागवडीमुळे आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनामुळे पक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण झाला आहे. धरणगाव, सुसे, मांजरगाव तसेच नांदूरमध्यमेश्वर, तारखेड आणि तामसवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचे समूह आढळून येत आहेत.
पक्षीनिरीक्षणासाठी उभारण्यात आलेले मनोरे, दुर्बिणींची सुविधा आणि मार्गदर्शक उपलब्ध झाल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. ब्रिटिशकालीन धरण, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या परिसरात सध्या पर्यटक, निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांची गर्दी दिसून येत आहे. पुढील काही आठवड्यांत थंडीचा कडाका वाढल्यास पक्ष्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.

🐦 अभयारण्यात दिसणाऱ्या प्रमुख पक्षी प्रजाती
ब्राह्मणी बदक, थापल्या बदक, मुरग बदक, तलवार बदक, मोठा ठिपकेदार गरुड, दलदली ससाणा, लाल व पांढरा सारस, रंगीत व उघड्या चोचीचा करकोचा, कॉमन क्रेन, जांभळी पानकोंबडी, चमचा, कमळ पक्षी, लाल मुनिया, जांभळा व राखी बगळा, तरंग खंड्या आदी पक्षी सध्या मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.
दर महिन्याला होणाऱ्या पक्षी गणनेमुळे पक्ष्यांच्या संख्येसह त्यांच्या सवयी, अधिवास आणि पर्यावरणीय समतोलाबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये निसर्गसंवर्धनाबाबत जागरूकता वाढत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply